---Advertisement---

चोरट्यांचा कारमधून प्रवास; लातुरात स्थागुशाची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Published On:
---Advertisement---

लातूर (दीपक क्षीरसागर):- लातूर जिल्ह्यातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) मोठी कारवाई केली आहे. कारमधून प्रवास करून रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सोन्याचे दागिने, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली कार आणि दुचाकी असा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अविनाश दिलीप भोसले (वय २४, रा. पाटोदा, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या साथीदारासह भादा, निलंगा, कासार शिरशी या भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या टोळीने अनेक चोरीच्या घटना घडवून आणल्या असून, त्याबाबत स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर स्थागुशाच्या पथकाने लातुरातील छत्रपती चौक, औसा रोड परिसरात सापळा लावला. यावेळी आरोपीला कार आणि दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि. सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर यांच्यासह पोलीस पथकातील अनेक जवानांनी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

या घटनेमुळे घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या हालचालींवर मोठा आळा बसला आहे. पोलिसांच्या तात्काळ आणि काटेकोर कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या टोळींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us On

---Advertisement---