लातूर (दीपक क्षीरसागर):- शहरातील पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी एका महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली असून तिच्याकडून तब्बल तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले आहे. यामध्ये एकूण 01,45,700 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई 20 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेकडून पर्समधील 5700 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरल्याची तक्रार गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हा क्रमांक 370/2025 कलम 303 (2) बीएनएस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपास पोलीस हवालदार नराळे यांच्या कडे सोपवण्यात आला.
या तपासात पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. या पथकाने संशयित महिला महेक ऊर्फ अदिबा अजीम शेख, वय 20, रा. खाडगांव रोड लातूर हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्याकडून चोरी गेलेले 5700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पुढील तपासात तिने आणखी दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली. यामध्ये गुरनं 279/2025 मधील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण आणि गुरनं 295/2025 मधील 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली. एकूण तीन गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करून सुमारे साडेएक लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे.
ही कारवाई करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक करे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, म.पोउपनि श्रीमती पोवार यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचारी टेकाळे, गवारे, जाधव, गिरी, भाडुळे, चंद्रपाटले, नराळे, शेळके, डोंगरे, गायकवाड आणि महिला पोलीस नंदा स्वामी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लातूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नागरिकांसाठी दिलासा देणारी आहे. अल्पावधीत तीन गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाली आहे.
लातूर पोलिसांची मोठी कारवाई; महिला चोरट्या जाळ्यात, तीन गुन्ह्यांची उकल आणि साडेएक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

---Advertisement---