---Advertisement---

घरफोडी व गन मेटल चोरी प्रकरण उघडकीस; 18 गुन्ह्यांची उकल, 15.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Published On:
---Advertisement---

लातूर – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, जनावर चोरी तसेच साखर कारखान्यातील गन मेटल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल 15 लाख 82 हजार 456 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईतून तब्बल 18 गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी 21 ऑगस्ट रोजी मुरुड येथील रेल्वे स्टेशन चौकाजवळ सापळा लावून रमेश उद्धव चव्हाण (वय 26, रा. धाराशिव) व शिवाजी लाला काळे (वय 45, रा. धाराशिव) या दोन संशयितांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेतून तब्बल 9 लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. चौकशीत त्यांनी लातूर जिल्ह्यासह नांदेड आणि इतर ठिकाणी घरफोडी, जनावर चोरी तसेच साखर कारखान्यातील गन मेटल वस्तू चोरी केल्याचे कबूल केले.

तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेल्या गन मेटल वस्तू मुरुड येथील भंगार दुकानदार मुक्तार मौला पठाण याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 1 टन 7 किलो वजनाचे, अंदाजे 6 लाख 57 हजार रुपयांचे भंगार जप्त केले. लातूर जिल्ह्यातील भादा, उदगीर ग्रामीण, कासारशिरशी, चाकूर, देवणी, अहमदपूर, उदगीर शहर, निलंगा, किल्लारी तसेच नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एकूण 18 गुन्ह्यांची उकल या तपासातून झाली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, भंगार साहित्य, जनावर चोरीसंबंधी वस्तूंचा समावेश आहे. आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची दाट शक्यता असून तपास सुरू आहे.

Follow Us On

---Advertisement---