लातूर : शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा यंदा लातूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २२ ऑगस्ट रोजी होणारा बैलपोळा उत्सव साध्या पद्धतीने, गोठ्यातच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
प्रशासनाच्या अहवालानुसार, लातूर जिल्ह्यात सध्या ४११ जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत. यापैकी २०० जनावरे बरी झाली असून १७९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ३२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात, गळ्यावर सूज येते, अशक्तपणा जाणवतो आणि पाणी न पिण्याची समस्या निर्माण होते.
रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी बाधित गावांमध्ये तसेच त्याच्या ५ किलोमीटर परिसरात जनावरांची खरेदी-विक्री व वाहतूक पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी गर्दी, मिरवणुका आणि सार्वजनिक साजरेपण टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचे मार्गदर्शन :
गोठ्याची स्वच्छता कायम ठेवा, शेण व मूत्राची योग्य विल्हेवाट लावा
गोचिड, गोमाशा आणि डास नियंत्रणासाठी नियमित फवारणी करा
जनावरांना स्वच्छ पाणी, हिरवा चारा व पौष्टिक आहार द्या
बाधित गावांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री व वाहतूक टाळा
बैलांच्या नाकात तेल किंवा इतर पदार्थ पाजणे तसेच शिंगांना पेंट लावणे टाळा
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आत्मियतेचा सण असला तरी यावर्षी पशुधनाच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उत्सव साधेपणाने, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून साजरा करणे हेच सर्वांसाठी हिताचे आहे.
जिल्ह्यात बैलपोळा सणावर लम्पीचे सावट; प्रशासनाचे साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
