उदगीर (दीपक क्षीरसागर):- उदगीर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. बोरगाव व धडकनाळ या गावांमध्ये सात रोहित्रे, उच्चदाबाचे सुमारे ४० पोल तसेच लघूदाब वीजवाहिनीचे जवळपास ७० ते ८० पोल कोसळल्याने वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील सुमारे ३०० वीजग्राहक अंधारात राहिले आहेत.
रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बोरगाव व धडकनाळ परिसरात पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वीजतारा व पोल जमीनदोस्त झाले. परिस्थितीची तातडीने दखल घेत लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले आणि लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांनी स्थानिक अधिकार्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत.
उदगीर विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र महाव्दार व ग्रामीण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. बाहेती यांनी जनमित्र तसेच देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या एजन्सींना पाचारण करून वीजयंत्रणा पुन्हा उभी करण्याचे काम हाती घेतले आहे. सतत सुरू असलेल्या पावसातही महावितरणची टीम वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. शक्य असेल तिथे पर्यायी यंत्रणा वापरून गावकऱ्यांना लवकरात लवकर वीजपुरवठा मिळावा यासाठी अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामावर देखरेख करत आहेत.
या परिस्थितीत महावितरणच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामस्थ मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने गैरसोयीला सामोरे जात असून लवकरच अंधार दूर व्हावा अशी आशा व्यक्त करत आहेत.
उदगीर तालुक्यात अतिवृष्टीने वीजपुरवठा खंडीत, महावितरणचे भरपावसात शर्थीचे प्रयत्न
